Saturday, May 11, 2013

पाणी-पुरी..

पाणी-पुरी..
एक कटोरी हातात घेऊन..
त्यात एक गच्च भरलेली पाणी-पुरी
ती उचलून तोंडात भरायची
तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं
मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर
कधी तोंडातून.. कधी नाकातून
कानशीलाजवलून वहाणारा ओघळ घामाचा
लागलेला तो ठसका जीवघेणा..
आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव.. हवी हवीशी.!!
.
.
आयुष्यही असच काहीसं..
रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं
नव्याने भरलेली पाणी-पुरी खायची..
उसळणा-या लाटात मग डुंबायचं की बुडायचं..
ते ज्याचं त्यानेच ठरवायचं
लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा
आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवस नवा नवासा..!!
.
.
पण .. फक्त..
"भय्या... ज़रा मिठा बनाना" असे इथेही सांगता आलं असतं तर.. !!!!

Saturday, May 14, 2011

येथे कोणीच नाही माझ्या परी दिवाने,

 येथे कोणीच नाही माझ्या परी दिवाने,
मी गीत गात आहे येथे गुन्हया प्रमाणे.
दे जीवना मला तू आता नवी निराशा,
हे दुख: नेहमीचे झाले जुनेपुराणे.
तेव्हा मला फुलांचा कोठे निरोप आला?
माझे वसंत होते सारे उदासवाणे.
सांगू नकोस की, मी तेव्हा जिवंत होतो,
तेव्हा जिवंत होते माझे मरून जाणे.
साधी सुधी न होती, माझी स्मशान यात्रा,
आली तुझी निमित्ते ! आले तुझे बहाणे !

Sunday, February 14, 2010

"संत"

काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी नाशकात बाबा आमटेंचा सत्कार घडवून आणला होता. तेव्हा भाषणाऐवजी त्यांनी "संत" ही कविता सादर केली होती.

“साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा”

आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा
उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर
सहस्त्रावधी वारकरी नेत्र
तुला पाहण्यासाठी.
माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत
निळ्या पाखरांचे थवे
तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी.

आकाशाचं मन कळत नाही
वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय
प्रकाशाच्या देवळात शिरता येत नाही
दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय
म्हणून थोडं वारेपण - थोडं दिवेपण -
उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी
तुझ्याच मेघशील जीवनातून,
तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण बांधण्यासाठी.

लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी
झेप घेते आकाशात हरवलेपणानं
काळाच्या परमाणूत का होईना
पण बारीकसा सूर्य होण्यासाठी,
क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी,
नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी.
तसंच आहे माझ्या शब्दांचं ह्या क्षणाला माखलेलं हे मोठेपण.

तसं पाहिलं, तर कोण तू आणि कोण मी?
कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी.
आणि तरीही
माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला
जातात केव्हा तरी तडे
आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन
स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे
तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्निरेषा.

अशाच शंभर आभासांत पहाट, रात्रीच्या नि:शब्दातून
मी पाहिले आहे तुझे शिल्पचित्र तीनशे मैलांवरूनही.
सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात,
पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणार्‍या विराट वृक्षावर
अपराजित कुर्‍हाड मारणारा तू.
सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून
माझ्या देहात महारोगाची लस घाला
म्हणून आव्हान फेकणारा तू.
श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा
सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा
वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा
दु:खाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा
दुबळ्या दयेच्या चिखलातून
माणुसकीला बाहेर काढणारा तू.
पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू.

अरे, आम्ही आहोत असे करंटे
की आमच्या पेठेत लागतात पताका
फक्त मंत्री आले तर.

सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा झुलू लागतात रस्त्यावर
तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर.
आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात
निषादाच्या तीव्र पट्टीवर
त्याचा जयजयकार करण्याकरता.

आणि तुझ्यासारखे संत
ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार
निघून जातात गस्त घालीत अंधारात.
उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून
आसवांच्या दलदलीतून
दु:खानं उसवलेल्या दुनियेवर
अमृताचं सिंचन करीत.

आणि

दोन शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर
तुमच्या पायखुणा,
आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी
तुमच्या मखमली पालख्यांचे
तुमच्या मेलेल्या मतांचे.
आम्ही होतो मतवाले शूर शिपाई
संरक्षण करण्यासाठी
मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे.

हे महामानवा,

आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार
एखादा गुच्छ एखादा हार
तीस पायांवर सरपटणार्‍या कॅलेंडरातील
एखादा शनिवार, रिकामा रविवार.

पण तरीही,

त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं,
आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी
जुने पडते आहे, नवे घडते आहे
काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ
जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन.

मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार
पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे
तांबडेलाल,
काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी.

या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे
ते फक्त तुझ्यासारख्याचं हात उभारून
काळाच्या किनार्‍यावरुन धावणारं
संग्रामशील माणूसपण.

"तुम्ही जाता तुमच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा."

हे यात्रिका,

विस्कटलेल्या शरीरांचा, चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन
तू तुझ्या मार्गानं जा
मागे वळून पाहू नकोस.
जो हिशेब कधी केला नव्हतास,
तो यापुढेही कधी करू नकोस.
तुला साथसोबत आम्ही करणार नाही.
आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश
तुझ्या रात्रीवर पडणार नाही.
तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही.
आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा
दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा.

पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला
ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर
असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला
ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर

हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण...

"जेथे जाशी तेथे - तो तुझा सांगाती
चालवील हाती - धरोनिया"

सकाळी उठावे | सुसाट सुटावे |

सकाळी उठावे | सुसाट सुटावे |
ऑफिस गाठावे | कैसेतरी ||

इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |
वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||

चढावे बशीत | गर्दीत घुशीत |
रोज या मुशीत | कुटताना ||

धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |
गाठण्या मुक्काम | सोस बये! ||

उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||

लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||

मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात |
आयुष्य ठेक्यात | बसेचिना ||

रोजची टुकार | कामे ती भिकार |
बंड तू पुकार | बुद्धी म्हणे ||

एक तो 'वीकांत' | एरव्ही आकांत |
समय निवांत | मिळेचिना ||

तेव्हाही आराम | असतो हराम |
कामे ती तमाम | उरकावी ||

लावून झापड | शिवावे कापड |
तळावे पापड | निगुतीने ||

कामसू सचिव | सखीही रेखीव |
गृहिणी आजीव | प्रियशिष्या ||

काया रे शिणते | मनही कण्हते |
कुणी का गणते | श्रम माझे? ||

नित्याची कहाणी | मनात विराणी |
जनांत गार्‍हाणीं | सांगो नये ||

पेचात पडतो | प्रश्नांत बुडतो |
जीव हा कुढतो | वारंवार ||

"अशी का विरक्त? | व्हावे मी उन्मुक्त |
जीव ज्या आसक्त | ते शोधावे ||

प्रपंच सगळा | सोडूनि वेगळा |
एखादा आगळा | ध्यास घेई ||

तारा मी छेडाव्या | निराशा खुडाव्या |
काळज्या उडाव्या | दिगंतरी ||"

अंगाला टेकत | लेकरु भेकत |
आणते खेचत | भुईवर ||

उशीर जाहला | जीव हा गुंतला |
प्रपंची वेढला | चहूबाजूं ||

कल्पना सारुन | मनाला मारून |
वास्तव दारुण | स्वीकारते ||

बंधने झेलावी | चाकोरी पेलावी |
वाट ती चालावी| 'रुळ'लेली ||

विसर विचार | रोजचे आचार |
होऊनि लाचार | उरकावे ||

काही न मागणे | केवळ भोगणे |
रोजचे जगणे | विनाशल्य ||

हा जन्म बिकट | गेलासे फुकट |
हाकण्या शकट | संसाराचा ||

तरीही अखंड | आशा ही अभंग |
मनी अनिर्बंध | तेवतसे ||

ठेवा तो सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |
विसर जगाचा | पाडी झणीं ||

जातील दिवस | निराश निरस |
झडेल विरस | आयुष्याचा ||

खरी की आभासी | आशा ही जिवासी |
बळ अविनाशी | देई खरे ||

पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||

Friday, January 29, 2010

http://movies.apple.com/media/us/iphone/2009/tours/apple-iphone3gs-guided_tour-cc-us-20090702_848x480.zip

Saturday, January 2, 2010

ती जाताना 'येते' म्हणून गेली

ती जाताना 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली !

म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली !

तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली
वार नखाचा हलके करून गेली !

घडे क्षणांचे रिते असे केले की
देहसुखाचा प्याला भरून गेली !

कळते हा बगिचा का फुलला माझा
काल म्हणे ती दारावरून गेली !

तसे पाहता पाउस तितका नव्हता
कळे न का ती इतकी भिजून गेली !

तिच्या भोवती गंध अता दरवळतो
सहवासचे अत्तर टिपून गेली !

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी....

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैश्यात् भावनेचा हा व्यापार पाहिला मी

अंधार वेढ्नांनी आक्रंद्तो तरीही
नज्ररेत् वासनेचा हा श्रंगार पाहिला मी
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी…..

ऱस्ते उन्हात् न्हाले सगळीकडे परंतू
वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी…..

थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सुर्यही जरासा लाचार पाहिला मी
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी……

- अनिल कांबळे