Saturday, January 2, 2010

कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे

एकटा दगडावरी बसुनी कधीचा पाहतो
कैक थकले थांबले हा मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही शून्य वाटे पंथ ही
शून्य वाटे साथ कुणी ना तयाची खंत ही

शून्यताही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे

लक्ष सुमनांचा जरीही रोज दाटे सोहळा
लक्ष ही जावे न तिकडे एवढा तो आगळा
यौवनाच्या रोम-रोमी जो शहारा पेरतो
तोच वादळवाट तो अन्‌ तो किनारा वाटतो

ज्यासवे फेकून वल्हे होत नौका जायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे

जीव जडता देतसे जो जीवलगावर जीवही
ज्या स्तुतीही सारखी अन्‌ सारखे आरोपही
झेलतो अन्‌ पेलतो जो दीपकाचे तेजही
अन्‌ दिव्याखाली जमे तो पोरका काळोखही

मान-गर्वा पार जाऊन सर्व ज्याचे व्हायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे

शोधते निष्पापता त्या लोचनांचे आरसे
पौर्णिमा ज्याच्या मनातून चंद्र घेऊन जातसे
तीर्थनेत्री दाटताना प्रहरशीतल व्हायचे
जन्म मृत्यू पार जाऊन पोचलो वाटायचे

उत्कटाच्या ऊन्ह छायेतून घर बांधायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे

No comments:

Post a Comment