अशक्त मुलाच्या आई वडिलांना डॉक्टरने सांगितले,
आता लिहायला लागलाच आहे, तर लिहु दे त्याला कविता,
टॉनिक वगैरे देतो मी
पण शक्यतो कविता लिहण्याची वेळ त्याच्यावर न आणलीत तर बरं!
जगणं सुंदर असल्याचं सिद्ध करता आलं
तर अवश्य दाखवा करुन..
कारण मृत्युच्या लेण्यांमधलं गुढ, सुंदर धुकं
त्याच्या मनात दाटलयं अगदी जन्मापासुन!
नाती, मित्र, प्रेम, मारवा, पैसा..
सगळ्यावर ठेचा खाईलच तो यथावकाश
फळ पिकण्या आधीच घाई नको शक्यतो
वा भरावं त्याचं पोट म्हणुन उपास तापास!!
शहाण्यासारखा लिहतो म्हणुन
शहाणा म्हणण्याची नको घाई…
तो लिहतो त्याच्यावरुनच
त्याचाच उडतो विश्वास
सुकण्या आधी शाई!!!
थोटे पडतील हात पाय.. घरामध्ये खचतेच भुई
साता जन्माचे पापग्रह नाचत राहतील थुई थुई
दिवसा झोप, रात्री जाग असे होवुन जाईल घर…
बोलुनसुद्धा उपयोग नाही, तो असेल रानभर
मुळातच उपचार कमीच या रोगाला
तुम्ही नाही तर दुसरं एखादं कारण असेलच हजर
त्यातुनही वाढलच तर वाढु दे हे दुखणं
यातुनच ओसंडत येतो एखादा ज्ञानेश्वर!!
- मौनाची भाषांतरे, संदीप खरे
No comments:
Post a Comment